Wednesday, 15 January 2014

गोष्ट तुझी नी माझी....-भाग-3


(गोष्ट तुझी नी माझी....-भाग-2 पासुन पुढे..)

KMK चा पहिलाच दिवस .. नवीन प्रोजेक्ट , नवीन टीम, नवीन जागा, कंपनी तीच असली तरी तिची होणारी चलबिचल बघणाऱ्यांच्या नजरेतून सुटत नव्हती,  मयूर ने आधीच दाखवलेल्या भीतीमुळे तस वाटलं असावं... तिच्या प्रत्येक गोष्टीत Partners in  crime” असणारी तिची जिवाभावाची सखी निशी सुद्धा तिच्या जवळ नव्हती. 

"कसं होईल आपलं इथे,  श्या .. आपण मिस करणार जुन्या गोष्टी.. प्रोजेक्ट सोडताना तितकीशी जाणीव झाली नाही आपल्याला कधी...." तिने स्वतःशीच confess केलं . 

टीम मध्ये कोणीतरी नवीन जॉईन झाली आहे अशी बातमी सगळीकडे एव्हाना पसरली होती, तिच्या कडे  वळणारी प्रत्येक नजर "टीम मधली नवीन मुलगी हीच का ती" असल्याने तिला उगाचंच ओशाळल्यासारखं होऊ लागलं. 

"प्रोजेक्ट चे डॉक्युमेंट मागावेत का?" इतकी  चिडीचूप टीम कधी पहिली नाही , कसे आहेत हे सगळे लोकं , प्रत्येक जण आप-आपल्या कामात बिझी , कुणी साधं बोलायला हि येत नाहीये इथे, मी बोलू का आधी, का नको ??? काय करू?? " ती सगळं मनाशीच बोलत होती.

कधी कधी तिची नजर मॉनिटर वरून वर जायची आणि कोणी ना कोणीतरी टीम मध्ये आलेल्या नव्या मुलीकडे पाहत असल्यामुळे तिचे डोळे पुन्हा कीबोर्ड ला चिटकायचे.
 
"अर्रे कोणी येत का नाहीये, किती उदास प्रोजेक्ट आहे हा...संथ, मयूर बरोबर म्हणत होता, मला नाही रहावस वाटत इथे ...... असो ब्लॉग तरी पाहू बऱ्याच दिवसात काही वाचलं नाहीये चांगलं " असं म्हणून तिने तिचा आवडता ब्लॉग उघडला.

सहजच सुचलं म्हणुन...या निनावी ब्लॉगच्या ती मनापासून प्रेमात पडली होती, त्याच्या प्रत्येक पोस्ट वर तिची कंमेंट असे. काही ट्रॅव्हल ब्लॉग असतात तर काही नुसतीच निसर्ग वर्णने, कधी कविता कुणाच्या तर काही फक्त आठवणी  कुठे काल्पनिक कथा तर कधी कुणाची ब्लॉग शिकवणी पण हा ब्लॉग कोणा एका पठडीत मोडणारा नव्हता, या ब्लॉग मध्ये सगळं होतं या लेखकाची लेखनशैली तिला खूप आवडे. 

"काय लिहितो राव हा.. अनामिक तूच रे माझा सखा सोबती .. मला माहिती आहे कि तू मला नेहेमीच साथ देशील .. "ब्लॉगवरची नवीन पोस्ट पाहून ती खुश झाली "चला नवीन टीम वाले अजून अर्धा तास नाही आले तरी काही हरकत नाही " ती पुटपुटली
"माझी खाऊची पेठ , वा ! यावेळची पोस्ट खाद्यपदार्थांवर दिसतेय , हा मुलगा कशावरहि लिहू शकतो , नुकताच भटकंती करून आलाय तर...!! तिने अर्ध्या तासात पूर्ण पोस्ट वाचून कंमेंट केली,  तरी नवीन टीम ने तिला डिस्टर्ब केलं नव्हत . . . .
"वाह्ह !!! मस्त लिहिलंय याने ... आज का तो दिन बन गया .. चला अजून काही करता येतंय का पाहू .."" 
तिला एवढ्या शांततेची कधीच सवय नव्हती,  प्रोजेक्टच काम,  निशीशी गप्पा आणि मयूरशी भांडण यात तिचा छान वेळ जायचा आणि इथे  २ऱ्या मजल्यावरची शांतता जणू तिला खायला उठली होती . 

काहीवेळ गेला असेल तोच नवीन प्रोजेक्ट चा मॅनेजर तिच्या डेस्कपाशी आला ..
"गुड afternoon miss , actually i was in a meeting , काय ओळख वगरे करून घेतलीस कि नाही " मॅनेजर

तिने नकारार्थी मान हलवली.

हाहाहा .. you seem quite shy…!! come on,  let’s have a formal introduction round for you!!.

आणि तिच्या पोटात गोळा आला .. [अर्रे हा काय करतोय .... एवढं फॉर्मल होत नसते अर्रे मी .. ओळख करून घ्यायला पाहिजे होती आधीच ..!

त्याने सर्वांना मीटिंग रूम मध्ये बोलावलं , मीटिंग रूम मध्ये १७ जण आणि पिन ड्रॉप सायलेन्स. तिच्या पोटात आलेला गोळा काही कमी होत नव्हता. 

"अगं भितेस काय " तिने दचकून मागे पाहिलं ... तुला तुझ्या बद्दल सांगायचंय.. अमेरिकेच्या आर्थिक आघाडीवर भाषण  नाही द्यायचं .. होत असं सुरवातीला .. होशील नीट .. घाबरू नकोस .. माझं नाव रम्या आणि तुझं?!?!” 

तिने तिचं नाव सांगितलं आणि तिला थोडंसं हायसं वाटायला लागलं , मॅनेजर ने formal introduction घेतलं , टीम बद्दल ची थोडीशी माहिती त्यानंतर बरेचसे जण कसे सुट्टीवर आहेत नाहीतर टीम कशी मोठी आहे ते दाखवता आलं असत असे म्हणून उगाचच "सुट्टी आणि तिचे दुरुपयोग " यावर पुढचा अर्धा तास भाषण दिलं . बाकी मॅनेजर टॅगला शोभतील अशी ४-५ वाक्य टाकत मीटिंग ची सांगता झाली. रम्यालाच तिला KT द्यायला सांगितल्यामुळे ती हि जरा खुश झाली .. 

“No  Wonder , हि टीम एवढी शांत असते , हा मॅनेजरच किती बोलतो इथे " ती  स्वतःशीच हसली . 

"खूप बोलतो ना हा ?? " रम्याने बाहेर पडत पडत तिला  प्रश्न केला .  

["अर्रे हिला मनातलं ऐकू येत कि काय " ??!!??]  "नाही ग असेच तर असतात सगळे मॅनेजर्स थोड्याफार फरकाने ... पण हा थोडा जास्त बोलतो " दोघी हसल्या 

"बरं , मी काही डॉक्युमेंट्स देते तुला, तु वाचून ठेवमग उद्यापासून तुझी KT सुरु करू OK ?!?" आणि रम्या तिच्या डेस्ककडे निघून गेली 

" हिच्याशी चांगलं पटेल .. तिला मनापासून नॉर्मल वाटत होतं ... बाकी टीम मधली पहिली वाहिली मैत्रीण तिला रम्याच्या रूपात भेटली होती ..!!
[क्रमश:]